previous arrow
next arrow
Slider

मोड जत्रा

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाची मंगळवारी मोड यात्रेने सांगता झाली. यात्रोत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या महाप्रसादाची ताटे लावणे या धार्मिक विधीला जनसागर उसळला आणि रात्री गर्दीने उच्चांक गाठला.सोमवारी पहाटे २ वाजल्यापासून आंगणेवाडी यात्रोत्सवास सुरुवात झाली. दिवसभर भाविकांची रीघ सुरू होती. सूर्य मावळतीकडे गेला आणि आंगणेवाडीकडे जाणारे सर्वच रस्ते गाड्यांनी भरून गेले. दिवसभरापेक्षा रात्रौ सिंधुदुर्गातील भाविकांनी यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी धाव घेतली.मंदिरावर तसेच संपूर्ण आंगणेवाडीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने छोटासा आंगणेवाडी गाव एखाद्या नव्या नवरीप्रमाणे नटल्यासारखा दिसत होता. रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास यात्रेचा परमोच्च बिंदू मानला गेलेला देवीला महाप्रसादाची ताटे लावण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यामुळे रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत दर्शन थांबविण्यात आले होते. 

आंगणेवाडीत आंगणे कुटुंबियांप्रमाणे इतर ग्रामस्थांनी महिला वर्गासमवेत महाप्रसादाची ताटे घेऊन येण्यास सुरुवात केली. डोईवर महाप्रसादाची ताटे घेऊन आंगणेवाडीच्या माहेरवाशिणी लगबगीने येत होत्या. चार पाच जणांच्या गटाने मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना ताटे लावण्यासाठी सोडण्यात येत होते.देवीला महाप्रसाद दाखवून माहेरवाशिणी मंदिरातून बाहेर पडत होत्या. देवीला प्रसाद दाखविल्यानंतर घरोघरी भाविकांना महाप्रसादाचे वाटप कारण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री १ वाजल्यानंतर ओटी भरण्याचा आणि दर्शनाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. त्यामुळे पुन्हा भाविकांचा दर्शनाचा ओघ सुरु झाला. यावर्षी दर्शनासाठी नऊ रांगांची सोय करण्यात आल्याने भाविकांना देवीचे दर्शन सुलभपणे झाले. रात्री भाविकांनी यात्रेत मोठी गर्दी केल्याने गर्दीने उच्चांक गाठला.

 

 

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोड यात्रेला भाविकांनी गर्दी केली होती. मोड यात्रेत दर्शनाबरोबरच भाविकांनी खरेदीचाही आनंद लुटला. सायंकाळपर्यंत दर्शनाची रांग सुरु होती. यावर्षीही एसटी महामंडळाने अव्याहत पणे बस सेवा सुरू ठेवली होती. तर वीज पुरवठाही सुरळीत सुरु होता.पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही. सायंकाळी तुलाभाराचा कार्यक्रम बंद करण्यात आला.या यात्रोत्सवात पाळणे, टॉयट्रेन, मौत का कुआ हे आणि इतर साहसी खेळ बच्चे कंपनीसाठी सज्ज ठेवण्यात आले होते. रात्रौ या खेळांना बच्चे कंपनीबरोबरच मोठ्यांनीही उपस्थिती दर्शवित आनंद लुटला. या यात्रोत्सवात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे वृत्त आहे.

या जत्रेला हजेरी लावण्यासाठी मुंबई, पुणे सह देशा-परदेशातून भाविक हमखास हजेरी लावतात. यंदादेखील कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेनिमित्त (Bharadi Devi Jatra) विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनासोबत एसटी महामंडळ आणि अन्य वाहतूक सेवादेखील वाढवण्यात आल्या आहेत. मग जगभरात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवीबद्दल तुम्हांला काही खास गोष्टी ठाऊक आहेत का?

आंगणेवाडीमधील भराडी देवीला केवळ सामान्य नागरिक नव्हे तर राज्यातील अनेक बडे नेते, कलाकार मंडळी हजेरी लावतात. त्यामुळे या दीड दिवसाच्या जत्रेमध्ये देवीचा गोंधळ, उपवास, नैवेद्य ते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही वेगळेपण दिसून येतं. पहा यंदा तुम्ही आंगणेवाडीच्या जत्रेला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या जत्रेबद्दल या काही खास गोष्टी नक्की जाणून घ्या. 

 
 आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रा 2024 बद्दल काही खास गोष्टी
 
    • भराडी देवी ही मालवणातील केवळ आंगणे या गावातील दैवत आहे. त्यामुळे या जत्रेमध्ये आंगणेवासियांना विशेष मान असतो. परंतू वर्षागणिक या जत्रेची वाढती लोकप्रियता पाहून देवीच्या दर्शनाला देशा-परदेशातून लोकं उपस्थित राहतात.
    • आंगणेवाडीतील भराडी देवी ही नवसाला पावणारी आहे अशी ख्याती असल्याने तिच्या जत्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये लाखो लोक उपस्थित राहतात तर कोट्यावधींची उलाढाल होते.
    • भराडी देवीच्या जत्रेच्या तारीख निवडीबद्दलही खास कुतुहल असतं. कारण ही तारीख कॅलेंडरनुसार नसून तर डुक्कराची शिकार करून देवीला कौल लावून तारखेची निवड केली जाते.
    • दीड दिवसाच्या आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये पहिला दिवस हा पाहुण्यांसाठी राखीव असतो तर दुसरा दिवस हा आंगणे ग्रामस्थांसाठी असतो. या दिवशी आंगणे गावातील माहेरवाशिणी एकत्र येऊन पूजा करतात विशिष्ट प्रसाद करतात.
    • आंगणेवाडीच्या जत्रेदरम्यान गावातील प्रत्येक घरात प्रसादाची तयारी केली जाते तसेच जत्रेमध्ये आलेल्यांना प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाते. यामध्ये भोपळ्याच्या वड्यांचा समावेश असतो. तसेच हा प्रसाद आंगणे गावातील माहेरवाशिणी अबोल राहून करतात.
    • देवीच्या नैवद्याचं ताट हिरव्या साडीत गाठोडं बनवून ठेवलं जातं. त्याची पूजा केली जाते. हे गाठोडं पूजेनंतर डोक्यावर घेऊन मुली मंदिरात जातात. त्यांना वाट दाखवण्यासाठी पेटती मशाल घेऊन गावकरी त्यांच्या मागे जातात. देवीच्या मंदिरात गाठोडं उघडून गार्‍हाणं म्हटलं जातं. काही प्रसाद आंगणेवाडीच्या घरात दिला जातो. हा प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी असते कारण या प्रसादाला देवी स्पर्श करते अशी भाविकांची धारणा आहे.
    • देवीच्या दीड दिवसांच्या जत्रेमध्ये धार्मिक प्रथा-परंपरांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन केले जाते. यामध्ये देवीचा गोंधळ खास मिरजेच्या गोंधळींकडून मांडला जातो तर सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं.

कोकणामध्ये आता पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तुम्हंला आंगणेवाडीच्या जत्रेनंतर जवळपास असणार्‍या काही पर्यटन केंद्रालाही भेट देता येऊ शकते. कोकणाला अथांग समुद्राचं वरदान लाभल्याने आता पर्यटनाच्या दृष्टीने वॉटर स्पोर्ट्सदेखील सुरू करण्यात आले आहेत.