previous arrow
next arrow
Slider


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री भराडीदेवीचं मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मालवणपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवस चालते. कालपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे.

कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला येणाऱ्या चाकरमान्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता कोकण रेल्वेबरोबरच खाजगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावाची एक वाडी. म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी. मात्र, गेल्या पाच-पंचवीस वर्षांत तिला मोठं स्वरूप आलं आहे. अनेकजण मोठ्या श्रद्धेने या जत्रेला येतात.

अशी ठरते भराडी देवीच्या जत्रेची तारीख!

कोकणात जत्रांची कमतरता नाही. वर्षाच्या ठरावीक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र श्री भराडीदेवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे.

दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर (बांबूपासून बनवलेली चटई) बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात आणि डुकराच्या शिकारीचा (पारध) दिवस ठरवतात. देवीला कौल लावला जातो. गावकरी जंगलात घुसतात आणि डुकराची शिकार वाजतगाजत घेऊनच परततात. त्यानंतर काही दिवसांनी जत्रेचा दिवस ठरवण्यासाठी पुन्हा डाळप स्वारी होते आणि कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित होतो.

सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जत्रेची तारीख. जत्रेची तारीख इतरांना कळवणं हा आगळा अनुभव फक्त या यात्रेतच पहायला मिळतो. एसटीवर, रिक्षावर, सुमोवर,  ग्रामपंचायतीच्या फळ्यावर जिथे जागा मिळेल तिथे प्रत्येक ठिकाणी खडूचा रंग उठतो आणि उमटली जाते ती जत्रेची तारीख.

भराडी देवीच्या जत्रेला देश-विदेशातून भाविक

आंगणेवाडी ही मालवण तालुक्यातील मसूरे गावची एक छोटीशी वाडी. पण या वाडीतील भराडी देवीची वार्षिक जत्रेसाठी आता मुंबई-पुण्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून मालवणी माणूस आवर्जून हजेरी लावतो. जत्रेची तारीख जाहीर झाली की, सिंधुदुर्गातील बहुतांश रिक्षांच्या मागे आंगणेवाडी जत्रेची तारील लिहली जाते. एसटीमध्येही खडूने जत्रेची तारीख लिहिली जाते.

२०-२५ वर्षांपूर्वी ही जत्रा काही हजारांच्या घरात होती. आता मात्र ती लाखांची झाली आहे. गेल्यावर्षी १२ लाख भाविकांनी या जत्रेला हजेरी लावली होती अशी पोलिसांची आकडेवारी सांगते.

 आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या यात्रौत्सव सोमवार, दि.2 मार्च  2024 रोजी थाटात संपन्न होणार आहे. लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातही आंगणेवाडीचा उत्सव प्रसिद्ध आहे. मालवण तालुक्यातील मसुरे या गावातील बारा वाडय़ांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी. या वाडीवर श्री देवी भराडी मातेचे मंदिर आहे. भराडीवर देवीचा दृष्टांत झाला म्हणून श्री देवी भराडी माता म्हणून संबोधली गेली. या वाडीत आंगणे आडनावाचे लोक जास्त प्रमाणात राहत असल्याने आंगणेवाडी असे नाव पडले आहे. आंगणेवाडीची श्री देवी भराडी माता नवसाला पावते म्हणून दरवर्षी लाखो भक्त उत्सवास येतात, दोन दिवसांचा उत्सव चालतो. देवीच्या दर्शनासाठी भल्यामोठय़ा रांगा लावल्या जातात. झुलता पूल व अन्य अशा रांगातून भाविक देवीचे दर्शन घेतात.

राज्याचे मंत्री, आमदार, खासदार, मुंबई व ठाणे महापालिकेचे नगरसेवक, महापौर असे विविध क्षेत्रांतील मान्यवर या जत्रौत्सवास उपस्थित राहतात. पूर्वी गँगस्टरही देवीच्या दर्शनासाठी यायचे. या उत्सवास सर्व प्रकारच्या भक्तांची मांदियाळी असते. श्री देवी भराडी मातेच्या उत्सवासाठी दर वर्षी गर्दीचा उच्चांक लोक पाहत आहेत. सुमारे १५ ते २० लाख भाविक दोन दिवसांच्या उत्सवात उपस्थिती दर्शवितात. या वेळी राजकीय पक्ष सेवा देण्याचे कामही करतात. पोलिसांच्या संरक्षणाशिवाय विविध मंडळेही या ठिकाणी सेवा कार्यासाठी वेळ देत असल्याचे सांगण्यात येते.


या देवीच्या उगमाविषयी कथा सांगण्यात येते. शिवाय देवीच्या नवसाला पावणाऱ्या अनेक चमत्कारांविषयी बोलले जाते. त्यापैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे. आंगणेवाडीतील पराक्रमी वीर पुरुष चिमाजी आप्पांच्या सेवेत गुप्तहेर होता. अटकेपार भगवा झेंडा फडकविण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता असा इतिहास सांगितला जातो. या स्वराज्य सेवेवर प्रसन्न होऊन कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी प्रसन्न होऊन मसुरे गावातील आंगणेवाडी या छोटय़ाशा भराडावर प्रकट झाली. या वीर पुरुषाला दृष्टांत झाला. त्याची दुभती गाय पान्हा सोडत असलेल्या जागी त्याने पाळत ठेवली. तेथे जवळच राईत जाऊन पाषाणावर आपल्या पान्ह्य़ाचा अभिषेक करताना गाय दिसली. या साक्षात्काराने प्रेरित होऊन राई मोकळी केली. गाय ज्या पाषाणावर पान्हा सोडायची, त्या जागी सजीव पाषाण सापडले. त्यानंतर पाषाणाची शुद्धता व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.


या देवीचा चरितार्थ चिमाजी आप्पांनी इनाम दिलेले दोन हजार एकर भरड आणि शेतजमीन आंगणे लोकांच्या वहिवाटीखाली आहे. देवीची जत्रा शेतीची कामे आटोपल्यावर ठरते. सर्वजण एकत्र येतात व डाळप करतात. त्यानंतर शिकार करून देवीचा कृपाप्रसाद घेतल्यानंतर एक महिना पूर्वीच देवीच्या उत्सवाची तिथी निश्चित होते. या जत्रेत देवीच्या दर्शनासोबतच विविध खरेदीची दुकाने थाटली जातात. त्यात शेतीअवजारापासून सुक्या म्हावऱ्यापर्यंत या जत्रौत्सवात विक्रीचा थाट चालतो. त्यासाठी मोठ-मोठे मंडप थाटले जातात. वाहनांची पार्किंग व्यवस्था केली जाते, तसेच सामान्य व व्हीआयपी भक्तांसाठी खास रांगा असतात. जत्रेच्या दिवशी देवीची पहिली ओटी भरल्यावर उत्सवास सुरुवात होते. देवीचा नैवद्य दाखविताना दर्शन थांबविले जाते. महाप्रसाद सर्वाना दिला जातो. मोड जत्राही थाटात भरवली जाते. या उत्सवासाठी खास रेल्वे, एस.टी. बस सोडल्या जातात. शिवाय मुंबईहून खास वाहने करूनही भक्त येतात. आंगणेवाडी जत्रौत्सवास पूर्वसंधीलाच थाटात प्रारंभ झाला. कडेकोट पोलीस बंदोबस्त हे या उत्सवाचे वैशिष्टय़ मानले जाते.